
नवी दिल्ली, 17 जुलै, (हिं.स.)। कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री (CITI) यांच्या वतीने आयोजित “सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड 2026” या पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्राप्ती सुविधा केंद्राच्या (TRF - Textile Recovery Facility ) उल्लेखनीय कार्यासाठी ‘महानगरपालिका स्तरावरील सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन’ (Waste Management Efforts at the Municipal Corporation Level)’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत मंडपम, नवी दिल्ली येथे नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री ना.श्री. पवित्र मार्गेरिटा यांच्या शुभहस्ते केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार स्विकारला.
‘परिवर्तनाचे धागे’ हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्र समितीच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालविले जाणारे टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्र हे देशातील पहिले महानगरपालिकास्तरीय वस्त्र कचरा पुनर्प्राप्ती केंद्र (Textile Recovery Facility) आहे. या केंद्रामार्फत टाकाऊ वस्त्र साहित्याचे संकलन, वर्गीकरण व पुनर्प्रक्रिया करून त्यास पुनर्वापरयोग्य स्वरूपात रूपांतरित करण्यात येते, तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या रोजगार निर्मितीसही चालना दिली जाते. हा प्रकल्प केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची वस्त्र समिती, नवी मुंबई महानगरपालिका आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येत आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालय (Ministry of Textiles) यांच्या शिफारशीनुसार आणि 'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री' (CITI) यांच्या वतीने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे प्रामुख्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे तसेच अधिकारी – कर्मचारीवर्गाचे, लोकप्रतिनिधींचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबईतील तमाम नागरिकांच्या अथक परिश्रमांचे फळ आहे अशी भावना उपमहापौर दशरथ भगत यांनी पुरस्कार स्विकारताना व्यक्त केली. हा पुरस्कार त्या प्रत्येक नागरिकाचा आहे, ज्यांनी स्वच्छतेला आणि शाश्वत जीवनशैलीला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे असे सांगत शहराला अधिक स्वच्छ, हरित, सुगंधी व सक्षम बनवण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई शहर एकात्म भावनेने कटिबद्ध असल्याचा विश्वास उपमहापौरांनी व्यक्त केला.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी वस्त्र कचरा व्यवस्थापनातील नवी मुंबई महानगरपालिकेची पुरस्कारप्राप्त कामगिरी हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगत सर्व नागरिकांचे व टीआरएफ केंद्रात कौशल्यपूर्ण कामगिरी करणा-या महिलांचे विशेष अभिनंदन केले आहे. यापुढील काळात प्रकल्पाची व्यापकता वाढविली जाणार असल्याचे टीआरएफ केंद्रप्रमुख उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर