
श्रीनगर , 17 जुलै (हिं.स.)।जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भद्रवाह परिसरात एका तरुणाने स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी)च्या जवानांकडील सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात त्या तरुणाचा मृत्यू झाला, तर एसओजीचे तीन जवान जखमी झाले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी एका धार्मिक उपदेशकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना गुरुवारी उशिरा रात्री घडली.संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर एसओजीचे एक पथक गुरुवारी जाई-गंडोह रस्त्यावर उंच पर्वतीय भागात सापळा रचून तैनात होते. हे ठिकाण भद्रवाह शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजता एसओजी पथकाने एका तरुणाला अडवले. त्यावेळी त्याने जवानांवर हल्ला करून त्यांची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या झटापटीदरम्यान एसओजीच्या एका जवानाने गोळी झाडली. गोळी लागल्याने तो तरुण गंभीर जखमी झाला, तर या घटनेत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
जखमींना भद्रवाह येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील विशेष उपचारांसाठी त्यांना डोडा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलविण्यात आले.अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चीका गावातील रहिवासी आरिफ हुसेन (वय ३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भद्रवाह शहरात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जाई परिसरात लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode