
बॉम्बस्फोट करण्याचे अपयशी प्रयत्नही केले
एटीएसच्या चौकशीत पुढे आली धक्कादायक माहिती
अहमदाबाद, 17 जुलै (हिं.स.) : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात असे आढळून आले आहे की, हे आरोपी कोणत्याही मोठ्या विदेशी नेटवर्कच्या थेट आदेशावर नव्हे, तर इंटरनेटवरील कट्टरतावादी आणि द्वेषपूर्ण सामग्रीच्या प्रभावामुळे दहशतवादी विचारांकडे वळले.
तपासानुसार, या आरोपींचे मुख्य केंद्र गुजरातमधील पालनपूर आणि भरूच येथील मदरसे होते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुणांच्या मनात देशविरोधी विचार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, आरोपींकडून जप्त करण्यात आलेली आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण पुस्तके अत्यंत धोकादायक स्वरूपाची आहेत. अशा साहित्याच्या संपर्कात आलेला सामान्य तरुणही देशविरोधी कारवायांकडे वळू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तपासादरम्यान आरोपींकडून पाकिस्तानी दहशतवादी मौलाना मसूद अजहरचे द्वेषपूर्ण व्हिडिओ, जैश-ए-मोहम्मदचा झेंडा आणि ‘मुजाहिद जिहाद कैसे करें’ यांसारखे आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे साहित्य नव्या तरुणांमध्ये वितरित केले जात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, बॉम्बस्फोट करण्याचा विचार या तरुणांनी स्वतः विकसित केला होता. आतापर्यंत या कटामागे कोणत्याही बाह्य शक्तीशी थेट संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत.
मुख्य आरोपी अमद जामिया अबुल हसन आणि त्याच्या गटाने 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान विविध ठिकाणी आयईडी आणि टाइमर बॉम्बच्या माध्यमातून आठ वेळा प्रयोग केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.आरोपी मोहम्मद अमीन शेरा याच्यासह इतर आरोपी इंटरनेटच्या माध्यमातून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचेही तपासात आढळले आहे. बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक रसायने आणि साहित्य ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून मागवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून माहिती मागवली
एटीएसचे डीसीपी हर्ष उपाध्याय आणि डीसीपी के. सिक्करवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींची चौकशी सुरू आहे. डिजिटल पुरावे मजबूत करण्यासाठी एटीसने इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉटसऍप्प आणि मेटा यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून आरोपींच्या ऑनलाइन हालचालींबाबत माहिती मागवली आहे.
ही कारवाई 8 जुलै 2024 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा भाग आहे. या प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सध्या गुजरात एटीएस राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने या कथित नेटवर्कचा पूर्णपणे पर्दाफाश करण्यासाठी तपास करत आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी