
नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबासाठी भारताला जबाबदार धरणाऱ्या जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांच्या विधानाला भारताने ठाम शब्दांत फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे विधान वैयक्तिक मत असून वस्तुस्थितीपासून दूर आहे असे स्पष्ट केले.
जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य हिदेकी माकिहारा यांनी सोशल मीडियावर भारत-जपान शिंकान्सेन (बुलेट ट्रेन) प्रकल्पात झालेल्या विलंबासाठी थेट भारतीय बाजूला जबाबदार धरले. भारतीय प्रतिनिधींनी वारंवार दिलेली आश्वासने पाळली नाहीत तसेच निर्णयांमध्ये सातत्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, प्रकल्पाशी संबंधित भारतीय मंत्र्यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही संबंधित पोस्ट पाहिली आहे. ते एक वैयक्तिक मत असून वस्तुस्थितीपासून बरेच दूर आहे. मुंबई-अहमदाबाद उच्च-गती रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहे.
दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा 15 ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सुरत–बिलीमोरा या मार्गावर सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाने नंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती देताना सांगितले की, मुंबई-अहमदाबाद उच्च-गती रेल्वे प्रकल्पाबाबत भारत-जपान चर्चा सुरळीत सुरू आहे. जपानकडून विकसित होत असलेल्या ई-10 सिरीजच्या अत्याधुनिक बुलेट ट्रेन 2030 च्या दशकाच्या प्रारंभी भारताला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारतातील बांधकाम वेगाने सुरू असून 2027 मध्ये पहिला टप्पा सुरू होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांच्या सहकार्याने संपूर्ण उच्च-गती रेल्वे प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी