
बंगळुरू, 17 जुलै (हिं.स.) : बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीनंतर ही धमकी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोची ही फ्लाइट काल रात्री 8 वाजता बंगळुरूहून अहमदाबादसाठी रवाना होणार होती. उड्डाणाच्या काही वेळ आधी विमानाच्या आत बॉम्बची धमकी असलेली एक चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या.
धमकीची माहिती मिळताच निर्धारित सुरक्षा प्रक्रियेनुसार (एसओपी) विमानाला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण विमान, प्रवाशांचे सामान आणि परिसराची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर विमानाने अखेर रात्री 1 वाजून 21 मिनिटांनी अहमदाबादसाठी उड्डाण केले.दरम्यान, विमानात ही बनावट धमकीची चिठ्ठी कोणी आणि कोणत्या कारणासाठी ठेवली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी