रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनमध्ये नेतृत्वबदल; सेरही कोरेत्स्कींची पंतप्रधानपदी नियुक्ती
कीव, 17 जुलै (हिं.स.)।रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या संघर्षाचा अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यू तसेच मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या घटना सातत्याने स
रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनमध्ये नेतृत्वबदल; सेरही कोरेत्स्कींची पंतप्रधानपदी नियुक्ती


कीव, 17 जुलै (हिं.स.)।रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या संघर्षाचा अद्याप कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी सैनिक आणि नागरिकांच्या मृत्यू तसेच मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये नेतृत्वबदल करण्यात आला असून, सेरही कोरेत्स्की यांची देशाच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी युलिया स्विरीडेंको यांची जागा घेतली आहे. स्विरीडेंको यांनी २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली होती.

सेरही कोरेत्स्की हे युक्रेनच्या सरकारी ऊर्जा कंपनी ‘नाफ्तोगाझ’चे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांची नियुक्ती विशेष मानली जात आहे, कारण ते कोणत्याही राजकीय पक्ष, संसद किंवा प्रशासकीय सेवेतून पुढे आलेले नाहीत. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून व्यवसाय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली आहे.

संकटकाळातील प्रभावी व्यवस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक सरकारी उपक्रमांचे पुनरुज्जीवन करून त्यांना तोट्यातून नफ्यात आणल्याचे श्रेय त्यांना दिले जाते. यापूर्वी त्यांनी इंधन आणि अन्नप्रक्रिया उद्योगांच्या व्यवस्थापन क्षेत्रातही काम केले आहे.

युक्रेनचे नवे पंतप्रधान सेरही कोरेत्स्की यांच्यासमोर त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी केवळ व्यावसायिक कौशल्य पुरेसे ठरणार नाही, तर राजकीय कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि सत्ताकारणातील गुंतागुंती हाताळण्याची क्षमता देखील त्यांना दाखवावी लागणार आहे.

माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आगामी हिवाळ्यातील कठीण परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याची महत्त्वाची जबाबदारी कोरेत्स्की यांच्यावर सोपवली आहे. संसदेतील मतदानात त्यांच्या बाजूने २८९ मते पडली.

युक्रेन सध्या आर्थिक टंचाई आणि रशियाविरुद्धच्या युद्धाचा दुहेरी सामना करत आहे. रशियाकडून सुरू असलेले हल्ले अद्याप कायम असून, नुकतेच कीव्हसह अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ८० जण जखमी झाले.

रशियाविरुद्धच्या युद्धकाळात सेरही कोरेत्स्की हे युक्रेनचे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे मत आहे की, आगामी हिवाळ्यातील युद्धपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोरेत्स्की हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत. यापूर्वी झेलेन्स्की यांनी संरक्षणमंत्री मिखायलो फेदोरोव यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर देशाच्या संसदेबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande