
बीजिंग , 17 जुलै (हिं.स.)।चीनच्या नैऋत्येकडील चोंगकिंग शहरात भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूस्खलनात अनेक निवासी इमारती माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या असून १,१०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
सरकारी प्रसारमाध्यमांने सांगितले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुमारे १० जणांचीही यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, चोंगकिंगमध्ये शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. या भूस्खलनात अनेक वीजखांब गाडले गेल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील अडचणी टाळण्यासाठी प्रभावित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील पाणी, वीज आणि गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
माहितीनुसार, हे भूस्खलन आज, शुक्रवार १७ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.०८ वाजता चोंगकिंगमधील पेंगशुई काउंटी येथे झाले. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती डोंगरउतारावरून खाली कोसळल्याने १० हून अधिक निवासी इमारती ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या.
माध्यमांनीने प्रसारित केलेल्या दृश्यांमध्ये डोंगराचा एक मोठा भाग निवासी वस्तीवर कोसळताना दिसत आहे. अनेक इमारती भूस्खलनग्रस्त भागाजवळ होत्या, तर बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत होती.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, परिसरातील जमीन अद्याप अस्थिर असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. त्या भागात पुन्हा भूस्खलन होण्याचा धोका कायम असल्याचेही सांगण्यात आले आहे.छायाचित्रांमध्ये इमारतींजवळील मोठमोठे दगड आणि खडकांचे तुकडे पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गाने खाली घसरताना दिसत आहेत. सुमारे पाच आणि पंधरा मजली अशा दोन इमारतींना नुकसान झाले असले तरी त्या अद्याप उभ्या आहेत.
मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन वुजियांग नदीच्या एका भागाजवळ झाले. ही नदी कार्स्ट पर्वतरांगांमधून वाहते आणि तिच्या परिसरात अनेक लहान शहरे तसेच टेरेस पद्धतीची शेती आढळते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, चोंगकिंगमध्ये ८,००० हून अधिक लोकांसाठी आपत्कालीन मदतसामग्री पाठविण्यात आली आहे. यामध्ये तंबू, फोल्डिंग बेड तसेच कुटुंबांसाठी आवश्यक आपत्कालीन किटचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode