मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा राज्यात जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल हवामान परिस्थिती यामुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढण्य
MH imd heavyrain Forecasts Monsoon Activity Next Three Days


मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा राज्यात जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल हवामान परिस्थिती यामुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, दक्षिणेकडील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

20 जुलैनंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकरी राजा चिंतेत असल्याचे बघायला मिळतंय. जर पाऊस पुढील दोन ते तीन दिवसात कोसळला नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट हे शेतकऱ्यांवर असणार आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली असताना, जुलैच्या पंधरवड्यातही राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात जुलैमधील सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली असून तेथे पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र दुष्काळसदृश स्थितीच्या सावटाखाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. बहुतांश भागात 20 ते 60 टक्क्यांदरम्यान पावसाची तूट असल्याचे दिसत आहे. सध्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. मोसमी पावसाला बळ देणाऱ्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे.

दरम्यान मुंबईत शुक्रवारी उपनगरांसह मध्य मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पहाटे आणि दुपारच्या वेळेत पावसाची हजेरी लागली असली तरी वातावरणातील बदलामुळे उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची धावपळ होत असून, वाहनचालक, पादचारी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रेनकोट आणि छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातही गेल्या वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. पावसाअभावी धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. धान रोपे आणि इतर पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने भातशेतीच्या लावणीच्या कामांना वेग आला आहे. उशिरा सुरू झालेला पाऊस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता पुन्हा चांगला पाऊस झाल्याने शेतातील कामांना गती मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र धरणांमधील पाणीसाठा अद्याप अपेक्षेइतका वाढलेला नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी शेतजमिनीची माती वाहून गेली आणि पिकांचे नुकसान झाले. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे शेतीकामांना वेग येण्याची आणि पाणीटंचाईची चिंता कमी होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande