
तेहरान, 17 जुलै (हिं.स.)। पश्चिम आशियातील तणाव आता अत्यंत वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला चढवला. अमेरिकन सैन्याने सलग सहाव्या रात्री इराणला लक्ष्य केले आहे. यावेळी केवळ लष्करी तळांवरच नव्हे, तर सामान्य नागरिकांशी संबंधित मूलभूत पायाभूत सुविधांवरही हल्ले करण्यात आले आहेत.
या हल्ल्यांमध्ये इराणमधील पूल, रेल्वे स्थानके आणि विमानतळांचे मोठे नुकसान झाले आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, हे हल्ले दक्षिणेकडील प्रांतांमध्ये झाले आहेत. हा संपूर्ण परिसर व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’जवळ आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा दावा आहे की ते इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, इराणचे म्हणणे आहे की अमेरिकेने जाणूनबुजून सामान्य जनतेच्या सुविधा आणि वाहतूक मार्गांना लक्ष्य केले आहे. इराणच्या आग्नेय भागातील इराणशहर विमानतळावर जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिकन लढाऊ विमानांनी विमानतळाला लक्ष्य करून थेट क्षेपणास्त्रे डागली. बंदर अब्बास शहरातील मुख्य रेल्वे जंक्शन स्थानकावरही हल्ला झाला. या स्फोटात तेथे कार्यरत असलेले दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
होर्मोजगान प्रांतातील दोन मोठे पूल नष्ट करण्यात आले. हे पूल बंदर खमीरजवळ होते. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पूल कोसळल्यामुळे बंदर अब्बास, खमीर आणि लार यांमधील रस्ता संपर्क तुटला आहे. बंदर अब्बास येथे मोबाईल आणि दळणवळण मनोऱ्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली. या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत.
इराणमधील केशम बेट, बुशेहर आणि अहवाज या शहरांमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. हा हल्ला अचानक झालेला नाही. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघड इशारा दिला होता. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर इराण चर्चेच्या टेबलावर आला नाही, तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
ट्रम्प यांनी कठोर शब्दांत म्हटले होते, “पुढील आठवडा इराणसाठी अत्यंत वाईट ठरणार आहे. आम्ही त्यांच्या वीज निर्मिती केंद्रांना आणि पुलांना लक्ष्य करू. जर ते चर्चेसाठी पुढे आले नाहीत, तर आम्ही त्यांचे सर्व वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करू.” ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर लगेचच अमेरिकेने संबंधित ठिकाणांवर हल्ले सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यांमुळे आता शेजारील देशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी कुवैतच्या आकाशात ३२ संशयित ड्रोन घिरट्या घालताना दिसल्याने तेथे खळबळ उडाली. तसेच, इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तेथेही ड्रोन हल्ल्याचा मोठा धोका असल्याचे मानले जात आहे.
अमेरिकन हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने बहरीन आणि कुवैतवर क्षेपणास्त्रे व ड्रोन डागल्याचे वृत्त आहे. या दोन्ही देशांमध्ये अमेरिकन सैन्याचे महत्त्वाचे तळ आहेत. दरम्यान, सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेला शांतता करार पूर्णपणे कोलमडल्याचे सांगितले जात आहे.आता अमेरिकेने इराणविरोधातील आपल्या कारवाईचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.
अमेरिकन सैन्याने केवळ दक्षिण इराणच नव्हे, तर प्रथमच राजधानी तेहरान आणि क्षेपणास्त्र केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेमनान प्रांतालाही लक्ष्य केले आहे. या तीव्र लष्करी कारवाईनंतर संपूर्ण आखाती प्रदेशात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode