
- ११ लाख २१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
नवी दिल्ली, १७ जुलै (हिं.स.) : वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा' (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) यंदा विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अधिकृतपणे नीट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एकूण २० लाख उमेदवारांपैकी ११ लाख २१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या संपूर्ण निकालात मुलींचे वर्चस्व स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. या परीक्षेत पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासहित 8 राज्यांतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करून टॉप 17 मध्ये स्थान पटकावलं आहे. महाराष्ट्राची श्रावणी कुदळे ही देशात पाचवी आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गुरुवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट यूजी परीक्षा २०२६ चा निकाल अधिकृतपणे घोषित केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश तसेच समुपदेशन प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी, यासाठी एनटीएने अत्यंत जलद गतीने काम करत नियोजित वेळेत हा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी २१ जून २०२६ रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १४ प्रमुख शहरांमधील एकूण ५,४४० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, यापैकी ११ लाख २१ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले असून ते देशातील विविध वैद्यकीय (MBBS), दंतवैद्यकीय (BDS), आयुष (AYUSH) आणि इतर संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्ड एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच neet.nta.nic.in वर पाहता येणार आहे.
यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. एकूण पात्र उमेदवारांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक मुली आहेत. विशेष म्हणजे, मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्ण होण्याचा सरासरी दर अधिक आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण मुलींपैकी ५६.८ टक्के मुली पात्र ठरल्या आहेत, तर मुलांचे हेच प्रमाण ५५.१ टक्के इतके आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे १७ ते १९ वर्षे वयोगटातील आहेत.
देशातील गुणवत्तेचा विचार केला तर पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पानशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. टॉप रँकर्सचा विचार केल्यास, ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे देशातील आघाडीचे १७ रँकर्स हे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा या ८ वेगवेगळ्या राज्यांमधून आले आहेत. ७२० पैकी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवणारे १३८ विद्यार्थी देशातील ६६ शहरांमध्ये पसरलेले आहेत, ज्यामध्ये तब्बल ९३ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. याशिवाय लडाखमध्ये जिग्मेत यांगचन लामो (530 गुण), अंदमान आणि निकोबार द्विप समूहातून ध्रुव त्रिपाठी (606 गुण), लक्षद्वीपमधून फहमिदा अनीस (573 गुण) गुण मिळवले आहेत. यात ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 17 राज्यातील टॉपर्सने 700 हून अधिक गुण मिळवले आहेत. तर 26 टॉपर्सने 690 हून अधिक गुण मिळवले आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी