
इस्लामाबाद, 17 जुलै (हिं.स.)। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान सध्या तुरुंगात असून, त्यांच्या पक्षाने ५ ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. इमरान खान यांच्या तुरुंगवासाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने सांगितले की, ५ ऑगस्टपासून आंदोलनाला सुरुवात होईल आणि खान यांची सुटका होईपर्यंत ते सुरू राहील. या कालावधीत देशभरात मोर्चे आणि निदर्शने आयोजित केली जाणार आहेत.
७३ वर्षीय इमरान खान सध्या रावळपिंडी येथील अदियाला कारागृहात एकांतवासात आहेत. इस्लामाबादमधील कनिष्ठ न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराचा दोषी ठरवल्यानंतर ५ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इतर अनेक प्रकरणांमध्येही त्यांना अटक करण्यात आली आणि दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे ते सातत्याने कारागृहात आहेत.
पीटीआयचे महासचिव सलमान अकरम राजा यांनी अदियाला कारागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले, “५ ऑगस्ट रोजी इमरान खान यांच्या तुरुंगवासाला तीन वर्षे पूर्ण होतील.” त्यांनी सरकारला पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करण्याचा इशाराही दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode