वांगचुकांना रुग्णालयात हलवताच अभिजित दिपकेंचे बेमुदत उपोषण सुरू
नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी त्या
Abhijit Dipke Indefinite Hunger Strike Following Wangchuk Hospitalization


नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदनातून स्पष्ट केले आहे. मात्र, या कारवाईनंतर आंदोलन थांबेल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वतः बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

अभिजित दिपके यांनी जंतर-मंतर येथे माध्यमांशी बोलताना, मी आजपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करत आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका. हे आंदोलन आता आणखी मोठे होईल. आम्ही २० जुलै रोजी नियोजित असलेला संसदेकडे मोर्चाही काढणार आहोत, असे सांगितले. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत, जंतर-मंतरकडे येत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा दावा केला. तू जंतर-मंतरपर्यंत कसा जातोस ते आम्ही पाहतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जंतर-मंतर परिसर लवकरात लवकर रिकामा करण्याचे आवाहन केले आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलविल्यानंतर आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात येणाऱ्या प्रस्तावित मोर्चाच्या अवघ्या दोन दिवस आधी ही कारवाई झाल्याने या प्रकरणाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, शुक्रवारीपर्यंत सोनम यांची प्रकृती स्थिर होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची कोणतीही गरज नव्हती. तसेच, त्यांच्या आणि त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या परवानगीशिवाय कोणताही उपचार किंवा औषध देऊ नये, असा त्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आंदोलनस्थळी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आंदोलनाला नवे वळण मिळाले असून येत्या काही दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande