
नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.) : लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्यावरील पोलीस कारवाईनंतर देशभरात राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी जंतर-मंतर येथे आंदोलनस्थळी भेट देत सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
अमित ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचूक हे देश, विद्यार्थी, शेतकरी आणि भारतीय सैन्यासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व आहे. अशा व्यक्तीला गेल्या वीस दिवसांपासून उपोषण करावे लागत असूनही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. उलट त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली, ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारवर दडपशाहीचा आरोप करत त्यांनी, आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या देशात जगत आहोत? असा सवाल उपस्थित केला. देशात कोणाचीही जबाबदारी उरलेली नसल्याची टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेचाही उल्लेख करत, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. सरकारने किमान चर्चेची प्रक्रिया सुरू करून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा होता, असेही ते म्हणाले.
अमित ठाकरे यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मधील कथित गैरव्यवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा करत, या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच देशात जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहावे, त्यांच्याशी तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी करत लोकशाहीमध्ये संवाद आणि नागरिकांच्या आवाजाचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule