
नवी दिल्ली, १८ जुलै (हिं.स.) : पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून, वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या दुसऱ्या वैद्यकीय केंद्रात हलवण्याची परवानगी मागितली आहे. पत्रात त्यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धती, वैद्यकीय माहिती आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गीतांजली आंगमो यांनी पत्रात नमूद केले की, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शनिवारी सकाळी सोनम वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत घसरल्याची माहिती दिली. आदल्या दिवशी दुपारी ४.१६ वाजता ही पातळी ४.३ असल्याचे सांगण्यात आले होते. या दोन्ही आकडेवारीतील विसंगतीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित वैद्यकीय अहवालांची प्रत देण्याची मागणी केली.
पत्रात त्यांनी असा आरोपही केला आहे की, वांगचुक यांच्या उपचारांवर देखरेख करणाऱ्या डॉक्टरांना कुटुंबीयांशी प्रत्यक्ष किंवा डिजिटल माध्यमातून संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली नाही. रुग्णालयातील पारदर्शकतेच्या अभावामुळे उपचार प्रक्रियेवरील विश्वास कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या दुसऱ्या वैद्यकीय केंद्रात हलविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डिस्चार्जची सर्व औपचारिकता तातडीने पूर्ण करून त्यांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या व उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे केली.
गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते प्रवास करण्यास सक्षम आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, २० जुलै रोजी प्रस्तावित संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे