
बेंगळुरू, 18 जुलै (हिं.स.) : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा देवेगौडा यांचे आज, शनिवारी वयाच्या बेंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 89 वर्षांच्या होत्या.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, श्वसनासंबंधीच्या आजारावर उपचारासाठी त्यांना बुधवारी ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी 4 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.या वेळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, त्यांचे पुत्र तसेच केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि कुटुंबातील इतर सदस्य रुग्णालयात उपस्थित होते.
चेन्नम्मा देवेगौडा यांचा एच. डी. देवेगौडा यांच्याशी 1954 मध्ये विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात 4 पुत्र आणि 2 कन्या असा परिवार असून, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि आमदार एच. डी. रेवण्णा हे त्यांचे पुत्र आहेत.राजकीय क्षेत्रातील दोन दिग्गज नेत्यांच्या पत्नी आणि आई असूनही चेन्नम्मा देवेगौडा यांनी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत केले. एच. डी. देवेगौडा यांनी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या त्यागाचा, खंबीर पाठिंब्याचा आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु