नागपुरात उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा आंदोलन’; भाजपावर जोरदार टीका
नागपूर, 18 जुलै (हिं.स.) : अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपुरात ‘रामरक्षा पठण आंदोलन’ केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी भाजपावर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून म
नागपुरात रामरक्षा पठन आंदोलन प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे


नागपूर, 18 जुलै (हिं.स.) : अयोध्येच्या राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपुरात ‘रामरक्षा पठण आंदोलन’ केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी भाजपावर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जय श्री राम, जय शिवराय म्हणणारे कट्टर हिंदू आहोत. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, मात्र भाजपाचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत बाबरी मशीद प्रकरणातील त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. बाबरी पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले होते. माझ्या शिवसैनिकांनी हे काम केले असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले होते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती,असे ठाकरे यांनी सांगितले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना, राम मंदिर लुटण्यासाठी राम मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फडणवीस यांना आव्हान देत, माझी चेष्टा करण्यापेक्षा लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात, हे स्पष्ट करा, असे उद्धव म्हणाले. यावेळी तरी पूर्ण रामरक्षा म्हणतील का? असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, हे आंदोलन रामरक्षा पाठ आहे की नाही हे पाहण्यासाठी नाही. आज रामभक्तांना रामाचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या कारभारामुळे ही वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावला.यावेळी त्यांनी अयोध्या, केदारनाथ आणि उज्जैन येथील कथित गैरव्यवहारांचा उल्लेख करत सरकारवर प्रश्न उपस्थित केले. श्रद्धेशी संबंधित विषयांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातील या आंदोलनात खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. रामरक्षा पठण करून राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.दादर, ठाणे आणि आता नागपूर येथे झालेल्या या आंदोलनांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. आगामी काळात ठाकरे गटाची राजकीय रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande