
नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशाला सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन आठवडे त्या कोणतेही भाषण, मुलाखत किंवा दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत.
सुप्रिया सुळे यांनी स्वतः समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. घशातील आणि आवाजातील त्रास जाणवल्यानंतर त्यांनी डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. तपासणीनंतर त्यांच्या घशात सूज असल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्यांना व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सुप्रिया सुळे पुढील उपचारांचा भाग म्हणून व्हॉइस थेरपी घेणार आहेत. किमान एक ते दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी परिस्थिती समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, येत्या २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेत आंदोलनाच्या मागण्यांना समर्थन दिले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार या आंदोलनासोबत असून संसदेतही या मुद्द्यावर आवाज उठवला जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधायला हवा होता, मात्र सरकारची भूमिका असंवेदनशील असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.
आता मात्र आरोग्याच्या कारणामुळे त्यांना काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहावे लागणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर त्या पुन्हा नियमितपणे सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule