
आंदोलकांना मारहाण केली, जबरदस्तीने घटनास्थळावरून हटवले- अभिजीत दीपके
नवी दिल्ली, 18 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. ही कारवाई अशा वेळी करण्यात आली, जेव्हा शुक्रवारीच आयपीएस अनुराग कुमार यांनी दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. शनिवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे डॉक्टरांचे पथक सोनम वांगचुक यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जंतर-मंतर येथे पोहोचले. तपासणीनंतर त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे उपस्थित आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती करून वांगचुक यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची परवानगी मागितली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास विरोध करत त्यांच्यावर आवश्यक उपचार आंदोलनस्थळीच करावेत, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरल्याने अखेर सकाळी सुमारे सातच्या सुमारास वैद्यकीय पथकाने सोनम वांगचुक यांना स्ट्रेचरवरून बाहेर काढले आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात सफदरजंग रुग्णालयात हलवले. त्या वेळी जंतर-मंतर परिसरात सुमारे १५० आंदोलनकर्ते उपस्थित होते.
सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने तीव्र अशक्तपणा आल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीवर सतत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मागील पाच दिवसांपासून वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलनकर्त्यांशी सातत्याने चर्चा सुरू होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.
आंदोलकांना मारहाण केली, जबरदस्तीने घटनास्थळावरून हटवले- अभिजीत दीपके
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात एक गंभीर दावा केला आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर कारवाई करताना आंदोलकांना मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना घटनास्थळावरून जबरदस्तीने हटवले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. नीट यूजीसारख्या स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणांमध्ये न्याय मिळावा, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक उपोषण करत होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानंतरच त्यांना रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नवी दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी सचिन शर्मा यांनी एक्सवरील पोस्टद्वारे स्पष्ट केले.
वांगचुक यांना रुग्णालयात नेताना काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरकोळ धक्काबुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी संयम राखत कोणताही मोठा अनुचित प्रकार होऊ न देता संपूर्ण कारवाई शांततेत पूर्ण केली. विशेष म्हणजे, ही कारवाई पहाटेच्या वेळी करण्यात आली, कारण त्या वेळी जंतर-मंतर येथे गर्दी अत्यल्प होती. त्यामुळे कोणताही मोठा संघर्ष टाळता आला आणि पोलिसांना कारवाई सुरळीतपणे पार पाडणे शक्य झाले. या घटनेनंतर पोलिसांनी जंतर-मंतरवरील उर्वरित आंदोलनकर्त्यांना शांततेने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहन केले असून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule