अमित शाहांची जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली, 19 जुलै (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्य
अमित शाह


नवी दिल्ली, 19 जुलै (हिं.स.) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांकडून बाधित भागांमधील सद्यस्थिती, मदत आणि बचाव कार्य तसेच प्रशासनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांची सुरक्षा आणि त्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि सर्व आवश्यक मदत तात्काळ पुरवली जाईल.

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलन झाले, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह सापडले असून, इतर अनेकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर यंत्रणा बाधित भागांमध्ये युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. खराब झालेले रस्ते आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि अत्यावश्यक मदत साहित्य पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पूंछ, राजौरी आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विभागाने लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नद्या, ओढे आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande