
काठमांडू , 19 जुलै (हिं.स.)। नेपाळ सरकारने १ आणि २ रुपयांच्या नाण्यांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या नाण्यांवरील नेपाळचा नवीन राजकीय नकाशा हटवून त्याऐवजी सातव्या शतकातील ऐतिहासिक ‘लो ग्याकर (घार) मठ’ याचे चित्र अंकित करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची पुष्टी केली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेपाळ राष्ट्र बँकेला १ आणि २ रुपयांच्या नव्या डिझाइनची नाणी जारी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाण्यांच्या डिझाइनमधील बदलाचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यानंतर गृह मंत्रालय आणि केंद्रीय बँकेला पुढील कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात आले आहेत.
नेपाळ राष्ट्र बँकेचे प्रवक्ते गुरुप्रसाद पौडेल यांनी सांगितले की, सरकारकडून मंजुरी मिळाल्याचा अर्थ नाण्यांचे डिझाइन अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. माहिती आणि संचार मंत्रालयानेही याला दुजोरा देत म्हटले की, नव्या नाण्यांमध्ये अधिक सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि नवीन डिझाइनचा समावेश असेल, ज्यामुळे कमी मूल्याच्या चलनाचे व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.
नेपाळ राष्ट्र बँक आता मुस्तांग जिल्ह्यातील मारंग गावात असलेल्या सातव्या शतकातील ‘लो ग्याकर (घार) मठाचे’ चित्र नाण्यांच्या दर्शनी भागावर अंकित करण्याची तयारी करत आहे. हा मठ नेपाळमधील सर्वात प्राचीन मठ मानला जातो. परंपरेनुसार, या ऐतिहासिक मठाची उभारणी गुरू पद्मसंभव यांनी केली होती.
या मठाचे चित्र नाण्यांवर आल्यानंतर २०२० मध्ये जारी करण्यात आलेला नेपाळचा वादग्रस्त राजकीय नकाशा आपोआप नाण्यांवरून हटवला जाईल. उल्लेखनीय म्हणजे, नेपाळच्या संविधानातील दुरुस्तीनंतर लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या क्षेत्रांचा समावेश असलेला ‘चुच्चे’ (टोकदार) नकाशा विक्रम संवत २०७८ मध्ये नाण्यांवर प्रसिद्ध करण्यात आला होता. आता जवळपास पाच वर्षांनंतर हा नकाशा पूर्णपणे हटवला जाणार आहे.
नेपाळ सरकारच्या या निर्णयाकडे देशाच्या सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून पाहता, काही वर्षांपूर्वी भारत-नेपाळ संबंधांमध्ये तणाव निर्माण करणारा वादग्रस्त नकाशा नाण्यांवरून हटवणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता नेपाळ राष्ट्र बँक ही नवी नाणी बाजारात नेमकी कधी आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode