
एसआयटी अहवाल आणि सीईओ नियुक्तीवर होणार चर्चा
अयोध्या, 19 जुलै (हिं.स.) : राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याच महिन्यात दुसऱ्यांदा विशेष बैठक बोलावली आहे. ही बैठक 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता अयोध्येतील मणिराम दास छावणी येथे आयोजित करण्यात येणार असून, सर्व ट्रस्टींना उपस्थित राहण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने बैठकीबाबत अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. ट्रस्टचे अंतरिम महासचिव कृष्ण मोहन यांनी आज, रविवारी बैठकीचा अजेंडा आणि परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी) सादर करणार असलेल्या अंतिम अहवालावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासोबतच 22 रोजी दुपारी 3 वाजेपासून ट्रस्टची आणखी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत ट्रस्टच्या विविध समित्यांच्या पुनर्गठनावर निर्णय घेतला जाणार आहे. तसेच समित्यांमधील सदस्यांची कमतरता, नवीन रचना आणि जबाबदाऱ्यांबाबतही चर्चा केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार समित्यांमध्ये बदल करण्यात येऊ शकतात.
राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील एसआयटीच्या अंतिम अहवालावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाच्या नियुक्तीसह इतर महत्त्वाच्या विषयांवरही विचारविनिमय केला जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिर ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरही निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसेच ६ जुलै रोजी झालेल्या ट्रस्टच्या मागील बैठकीच्या कार्यवाहीला मंजुरी देणे आणि ट्रस्टच्या नियमांनुसार विविध समित्यांचे पुनर्गठन करणे या विषयांचाही समावेश आहे.गेल्या 6 जुलै रोजी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत देणगीतील कथित अनियमिततेच्या चौकशीदरम्यान माजी महासचिव चंपत राय आणि माजी ट्रस्टी अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले होते.
दरम्यान, राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी रामशंकर यादव उर्फ 'टिन्नू' आणि त्याचा पुतण्या मनीष यादव यांची 39 तासांच्या कोठडीतील चौकशी केली. न्यायालयाकडून पोलिसांनी 39 तासांची कोठडी मिळवली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी