लोकसभेत शिंदे सेनेची ताकद वाढली; सहा खासदार झाले अधिकृत सदस्य
नवी दिल्ली, 19 जुलै (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्लीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने अ
Shinde Sena strength LS has increased six MPs official members


नवी दिल्ली, 19 जुलै (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्लीत मोठा राजकीय धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब केल्याने आता हे सहाही खासदार कायदेशीररित्या शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत सदस्य झाले आहेत.

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या निर्णयाबाबत वेगळी अपेक्षा नव्हती. आम्ही गेल्या काही काळापासून अशाच प्रकारचा अन्याय सहन करत आहोत आणि हे संपूर्ण देश पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले, तेच आज देशासोबत घडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे. आमच्यासोबत आलेल्या सहा खासदारांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, मुंबई दक्षिण-पूर्वचे संजय दिना पाटील, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.

या खासदारांनी अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यानंतर या गटाने शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेला ठाकरे गटाने विरोध केला होता आणि कायदेशीर आव्हान देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेनंतर या सहाही खासदारांचे स्थान सुरक्षित झाले असून, ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय आणि कायदेशीर धक्का मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande