
लातूर, 19 जुलै (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता आपल्या एक एकर टोमॅटो पिकाला वाचवण्यासाठी सुरू केलेला संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पावसाने दगा दिल्याने टोमॅटो पीक सुकण्याच्या मार्गावर असताना त्यांनी टँकरने पाणी विकत आणून घागरीने प्रत्येक रोपाला पाणी घालण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू ठेवला आहे.
यंदाच्या अनियमित पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. त्यातच वाढता उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई आणि टँकरच्या पाण्यावर होणारा अतिरिक्त खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत मैनुद्दीन शेख हे कुटुंबीयांसह दिवसभर उन्हात राबत प्रत्येक टोमॅटोच्या रोपाला घागरीने पाणी घालत आहेत.
पीक वाचलं तरच घर चालेल, या आशेवर ते हा संघर्ष करत असून, पीक जगवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर केवळ मैनुद्दीन शेख यांचेच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.शेतकऱ्याच्या या जिद्दीची आणि मेहनतीची परिसरात चर्चा असून, संकटाच्या काळातही न डगमगणाऱ्या शेतकऱ्याचे हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis