


मुंबई, 19 जुलै (हिं.स.)। मुंबईमध्ये लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. रोजगार, शिक्षण, शेतकरी, लोकशाही आणि आंदोलन करणाऱ्यांवरील कारवाई या विविध मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सरकार युवकांना रोजगार देत नाही, दर्जेदार शिक्षण देत नाही, त्यामुळे हे दळभद्री सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते बनण्याचे आवाहन केले. तुमच्यातील आक्रोश आणि जिद्द हे सरकार बदलेपर्यंत कायम पेटती राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वांगचुक यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. बर्फाच्छादित भागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी छावणी उभारली, तसेच लडाखमधील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम बर्फ पर्वत तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. अशा व्यक्तीला देशद्रोही किंवा चीनचा हस्तक ठरवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. लष्करासाठी अहोरात्र काम करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याऐवजी सरकार त्यांच्यावर आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी ते म्हणाले, येथे अनेक महिला उपस्थित आहेत. आपल्या घरात साधी महिला झुरळाला घाबरते, असे म्हटले जाते. पण येथे पंतप्रधान आणि सरकारच झुरळाला घाबरते. जगातील सर्वात मोठा पक्षही झुरळाला घाबरतो.सत्ताधाऱ्यांनी भाड्याने माणसे आणली. ते झुरळाला का घाबरतात, हे आता कळले. कारण हे भाडखाऊ आहेत. चोरून आणलेली माणसे आहेत. यांच्याकडे स्वतःची माणसे नाहीत. म्हणूनच ते झुरळाला घाबरतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
या तरुणांना तुम्ही झुरळं म्हणता? सत्तेवर बसण्याची संधी तुम्हाला स्वातंत्र्यामुळे मिळाली. स्वातंत्र्यसैनिक फासावर गेले, तेही याच वयाचे होते. ते झुरळं होती का? त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य अनुभवतो. ते स्वातंत्र्य टिकवायचं की नाही, हा प्रश्न आहे.होय, मीही झुरळ आहे. तरुण झुरळं असतील तर त्यांचे आई-वडीलही झुरळंच आहेत. मग हा देश झुरळांचा आहे का?आम्हाला झुरळ म्हणणाऱ्यांना मी 'गोचिड' म्हणतो. ही सत्तेला चिकटलेली गोचिडं आहेत. त्यांना सत्तेतून दूर केलं पाहिजे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
यावेळी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून देताना ठाकरे म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आदर ठेवत चर्चेसाठी विलासराव देशमुख यांना पाठवले होते. मात्र आज आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर दडपशाही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे सांगत देशभरातील नागरिकांना आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. जिथे जिथे शक्य असेल तिथे सभा घ्या, मशाल मोर्चे काढा, मानवी साखळी उभारा, मेणबत्ती मोर्चे आयोजित करा. देशभक्त नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी, मी अण्णा आहे अशा टोपीप्रमाणे आता मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही असा संदेश देण्याचे आवाहन केले.
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करून भागणार नसल्याचे सांगितले. रोजगार, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आता केंद्रातील सरकार बदलण्यासाठी देशभरात व्यापक जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ही ठिणगी मोठा वणवा ठरू शकते. ही आग सरकार बदलेपर्यंत कायम राहिली पाहिजे, असे सांगत त्यांनी नागरिकांना एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन केले.
सरकारवर अंतिम प्रहार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला तरी सत्य लपवता येणार नाही. सरकारच्या पापाचा कोंबडा लवकरच आरवणार असून, हिंमत असेल तर केंद्र सरकारने तातडीने निवडणुका जाहीर कराव्यात. आम्ही पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तयार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule