इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना प्रवास टाळण्याचा सल्ला
भारतीय दूतावासाने जारी केली प्रवास सूचना नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.) : इराणमधील वाढत्या संघर्ष आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने रविवारी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुधारित प्रवास सूचना (ऍडव्हायजरी) जारी केली आह
इराणचा प्रवास टाळावा, तेथील भारतीयांनी देश सोडण्याचा विचार करावा- भारतीय दूतावास


भारतीय दूतावासाने जारी केली प्रवास सूचना

नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.) : इराणमधील वाढत्या संघर्ष आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दूतावासाने रविवारी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुधारित प्रवास सूचना (ऍडव्हायजरी) जारी केली आहे. दूतावासाने भारतीय नागरिकांना सध्या इराणचा प्रवास टाळण्याचा कडक सल्ला दिला असून, तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी उपलब्ध विमानसेवांचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात देश सोडण्याचा विचार करावा, असे आवाहन केले आहे.

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या अधिकृत ऍडव्हायजरीनुसार, सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणत्याही कारणासाठी इराणला जाण्याचे नियोजन पुढे ढकलावे. तसेच, सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

दूतावासाने स्पष्ट केले आहे की, जे भारतीय नागरिक इराणमध्येच राहण्याचा निर्णय घेतील त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच सुरक्षा परिस्थितीतील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवास सूचनेत दक्षिणेकडील किनारी भागांसह उच्च लष्करी हालचाली असलेल्या संवेदनशील क्षेत्रांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, इराणमध्ये वास्तव्यास असून अद्याप भारतीय दूतावासाकडे नोंदणी न केलेल्या नागरिकांनी तातडीने नोंदणी करावी आणि दूतावासाच्या अधिकृत संकेतस्थळ व सोशल मीडिया खात्यांवरील अद्ययावत माहितीकडे नियमित लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अलीकडील काळात इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र झाला आहे. दोन्ही देशांकडून मध्य पूर्वेत एकमेकांविरुद्ध कारवाया करण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहेत. अमेरिकन सैन्याने इराणविरोधातील सलग आठव्या दिवशी हवाई हल्ल्यांची मोहीम सुरू ठेवल्याचा दावा केला आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी अमेरिकेवर आपल्या वचनबद्धतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला असून, त्यानंतर इराणने शांतता सामंजस्य करारांतर्गत काही जबाबदाऱ्यांचे पालन थांबविल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, मध्य पूर्वेत तैनात असलेले ५० हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक उच्च सतर्कतेवर असून लष्करी कारवाया सुरू आहेत.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande