
अमरावती, 20 जुलै (हिं.स.) । चांदूररेल्वे तालुक्यातील एका मठाच्या महाराजाने मठात बोलावून ती अल्पवयीन असतानाच बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. त्या आधारे संशयिताविरुद्ध अत्याचारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडिता अल्पवयीन असतानाच तिची ओळख एका धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०१४ मध्ये संशयितासोबत झाली होती. संशयिताने तिचा विश्वास संपादन करून २०१६ मध्ये मठामध्ये बोलावून घेतल्यावर इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला जीवाने मारण्याची धमकी दिली. संशयिताने पीडितेला २०१६ ते मे २०२६ या कालावधीत लग्नाचे व आयुष्य सुखी करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. आपले संशयिताने मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद करून लग्न झाल्यानंतरही संशयिताने तिच्यासोबत संपर्क ठेवून पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केले. घटस्फोटानंतर पुन्हा पीडितेला पत्नीसारखे ठेवून लैंगिक शोषण केले, असा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून चांदूररेल्वे पोलिसांनी संशयित महाराजाविरुद्ध अत्याचारासह पोक्सो व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेकडून संशयिताने मठात येणाऱ्या भक्तांकडून पैसे गोळा करून घेतल्यावर स्वत:च्या उपयोगासाठी त्याचा वापर करून घेतला. त्यानंतर तिला मठाबाहेर काढण्यात आले. मारहाण करून मठातून हाकलून दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. यासंदर्भात चांदूररेल्वेचे पोलिस निरीक्षकसुरेश मस्के म्हणाले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. त्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी