
रायगड, 20 जुलै (हिं.स.)। : रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानाव गावातून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या ३६ तासांत शोधून काढत रेवदंडा पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि वेगवान समन्वयाच्या जोरावर ही कारवाई यशस्वी झाली असून, चोरीची टीव्हीएस एनटॉर्क दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
खानाव येथील जितेश भास्कर पाटील यांनी १६ जुलैच्या रात्री त्यांची टीव्हीएस एनटॉर्क (एमएच-०६-सीएस-८७४५) ही दुचाकी घराच्या अंगणात उभी केली होती. मात्र १७ जुलैच्या पहाटे अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या देखरेखीखाली आणि पीएसआय अंगज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात आरोपी चोरीची दुचाकी घेऊन पेण–पनवेल मार्गे जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांच्या मदतीने पळस्पे परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान पोलीस कर्मचारी मनीष ठाकूर, तुषार पारवे, केदारनाथ साखरकर आणि समीर धुरी यांनी शंकर मंगल गिलवा (वय ३३, रा. चंपागड, ता. राऊरकेला, जि. सुंदरगड, ओडिशा) याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.
अवघ्या ३६ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक करण्यात आल्याने रेवदंडा पोलिसांच्या तांत्रिक तपास, तत्परता आणि प्रभावी कारवाईचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष ठाकूर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)