
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । साखरपा-सुर्वेवाडी (ता. संगमेश्वर) येथील एका घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी संशयित असलेल्या मायलेकीला देवरूख पोलिसांनी अटक केली.
फरार असल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. वॉरंट रद्द करून घेण्यासाठी त्या देवरूख पोलीस ठाण्यात हजर झाल्या असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा बने आणि शरयू बने अशी अटक करण्यात आलेल्या मायलेकींची नावे आहेत. त्या साखरपा-सुर्वेवाडी येथील सरिता सुर्वे यांच्या घरी वास्तव्यास होत्या. १० सप्टेंबर २०२४ ते २४ जून २०२५ या कालावधीत घरातील सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद सरिता सुर्वे यांनी दिली होती. त्यानुसार बने मायलेकींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी