
पुणे, २० जुलै : पुणे महापालिकेच्या विविध विभागांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका उमेदवाराकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळून बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेतील एका शिपायासह चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिकेच्या परिसरासह इतर ठिकाणी आरोपींनी हा फसवणुकीचा प्रकार केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी महापालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत उमेदवाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून ४५ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर, पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बनसोडे तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच अशाच प्रकारे इतर उमेदवारांचीही फसवणूक झाली आहे का, याचाही तपास सुरू आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु