समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, कारचा चुराडा
वर्धा, 20 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विरूळ इंटरचेंजजवळ भरधाव ट्रकने थांबलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर ट्रकला आग
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू


वर्धा, 20 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विरूळ इंटरचेंजजवळ भरधाव ट्रकने थांबलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर ट्रकला आग लागून तो जळून खाक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून मुलीचे प्रवेशाचे काम पूर्ण करून नागपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबाची कार समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकली होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चालकासह तीन जणांचा तसेच ट्रकमधील चालक आणि क्लीनर यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला.

यापूर्वी रात्रीच्या सुमारास इथेनॉल वाहून नेणारा एक ट्रक पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे काही काळ वाहने थांबली असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ट्रकला आग लागली असून तो मिरचीचा माल घेऊन जात होता.

घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस आणि पुलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मध्यरात्रीपासून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, मृतांच्या पार्थिवांना शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande