
वॉशिंग्टन, 20 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची पत्नी आणि अमेरिकेच्या सेकंड लेडी उषा व्हान्स यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नवजात बाळाचे नाव ऍलेक नील व्हान्स असे ठेवण्यात आले आहे.
हा क्षण अमेरिकेच्या इतिहासासाठी अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण, गेल्या १५६ वर्षांत प्रथमच एखाद्या कार्यरत उपराष्ट्राध्यक्षांच्या घरी त्यांच्या कार्यकाळात अपत्याचा जन्म झाला आहे. व्हान्स दाम्पत्याने स्वतः सामाजिक माध्यमांवर संयुक्त निवेदन जारी करून ही आनंदाची बातमी जगासोबत शेअर केली.
उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितले की, आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत. कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे त्यांच्या इतर तिन्ही मुलांमध्येही मोठा उत्साह आहे. ऍलेक नील व्हान्स आता आपल्या तीन मोठ्या भावंडांमध्ये सामील झाला आहे. या कुटुंबात यापूर्वीच 9 वर्षांचा इव्हन, 6 वर्षांचा विवेक आणि 4 वर्षांची मिराबेल आहेत.या विशेष प्रसंगी व्हान्स दाम्पत्याने वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथील डॉक्टरांचे तसेच व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
जेडी व्हान्स हे अमेरिकेतील घटत्या जन्मदराविषयी नेहमीच चिंता व्यक्त करत आले आहेत. ते देशवासीयांनी अधिक मुले जन्माला घालावीत, अशी भूमिका सातत्याने मांडत असतात. २०२५ मधील एका सभेतही त्यांनी देशातील बालसंख्या वाढविण्यावर भर दिला होता. ते अनेकदा आपल्या पत्नी आणि मुलांसह परदेश दौऱ्यांवर जाताना दिसतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode