राजौरी-पुंछमध्ये पावसाचा कहर; अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रा सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित
जम्मू, 20 जुलै (हिं.स.)। जम्मू विभागातील पुंछ आणि राजौरी येथे रविवारी अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण बेपत्ता आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता स
Jk flashflood search rescue co


जम्मू, 20 जुलै (हिं.स.)। जम्मू विभागातील पुंछ आणि राजौरी येथे रविवारी अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण बेपत्ता आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता सोमवारी दुसऱ्या दिवशीही श्री अमरनाथ यात्रा आणि माता वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. पुरामुळे घरे, सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनावरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुंछ जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून शेजारील राजौरी जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरामुळे जम्मू विभागातील 145 निवासी घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी 93 घरे पुंछमध्ये, 42 राजौरीमध्ये, आठ रियासीमध्ये आणि प्रत्येकी एक घर किश्तवाड व रामबन येथे नुकसानग्रस्त झाले आहे. पुंछमध्ये 17 शाळा, 24 पारंपरिक पाणचक्क्या आणि तीन दुकाने यांचेही नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये बीएसएनएल आणि एअरटेलच्या मोबाईल सेवा विस्कळीत राहिल्या. राजौरीमध्येही मोठी हानी झाली असून बेला बसस्थानक आणि चिल्ड्रन्स पार्कचा सुमारे 90 टक्के भाग वाहून गेला आहे. एका शाळेचे आणि 56 वाहनांचे नुकसान झाले असून सुमारे 300 घरांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, किश्तवाडच्या छत्रू तहसीलमध्ये बटवान नाल्यात अचानक आलेल्या पुरामुळे एका जामा मशिदीचे, एका मदरसा इमारतीचे आणि एका दुकानाचे अंशतः नुकसान झाले आहे. एकूण 127 कनाल शेती क्षेत्र बाधित झाले असून त्यात पुंछमधील 92 कनाल आणि राजौरीतील 35 कनाल जमिनीचा समावेश आहे.

एसडीआरएफ, पोलीस, नागरी प्रशासन आणि इतर यंत्रणांची बचाव पथके बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत असून नुकसानीचे मूल्यांकन तसेच अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्याचे कामही सुरू आहे. चेनानी-नाशरी बोगद्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील एक बोगदा बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे चोबू नाल्यात अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे उधमपूर-पंचेरी आणि कैंथगली-मौंगरी हे रस्ते बंद झाले आहेत.

उपराज्यपाल पूरग्रस्त जिल्ह्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. खराब हवामान लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा आणि माता वैष्णोदेवी यात्रा आज सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्याचे तसेच बचाव, मदत आणि पुनर्बहालीची कामे वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री आजपासून प्रभावित जिल्ह्यांच्या दौऱ्याला सुरुवात करू शकतात.

हवामान विभागाने 23 जुलैपर्यंत रियासी, उधमपूर, रामबन, जम्मू, कठुआ आणि सांबा या अनेक जिल्ह्यांसह डोडा, किश्तवाड, राजौरी आणि पुंछच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, अचानक पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande