नेकनूर मोबाईल चोरीचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत, २२ हजारांचा मोबाईल जप्त
बीड, 20 जुलै (हिं.स.) : नेकनूर आठवडी बाजारात चोरीला गेलेल्या मोबाईलप्रकरणी नेकनूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी
पोलीस कारवाई


बीड, 20 जुलै (हिं.स.) : नेकनूर आठवडी बाजारात चोरीला गेलेल्या मोबाईलप्रकरणी नेकनूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी नेकनूर येथील आठवडी बाजारात फिर्यादी सूर्यभान मल्हारी तोंडे यांचा व्हिवो-वाय 300 कंपनीचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 294/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी भेट देत गोपनीय माहिती आणि स्थानिक पडताळणीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. या कारवाईत ऋषिकेश बंडू जाधव (वय 25, रा. तेलगाव नाका, बीड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीकडून अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांची उकल होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, नेकनूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आठवडी बाजार, जत्रा, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोबाईल, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. तसेच, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande