
लिमा, 20 जुलै (हिं.स.)। दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात शनिवारी रात्री एकामागे एका भूकंपाने जमीन हादरली. पहिला भूकंप ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा झाला. त्यानंतर काही वेळातच ३.७ तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. दरम्यान,या भूकंपाची तीव्रता ५.५ नोंदवण्यात आली. या भूकंपांनी मोठी हानी केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून २१ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक इमारती कोसळल्या असून सुमारे ३०० लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. सध्या बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
पेरूच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जुनिन प्रदेशातील चुपाका प्रांतात पहिला भूकंप ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा झाला. त्यानंतर काही वेळातच ३.७ तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. दरम्यान, अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) ने पहिल्या भूकंपाची तीव्रता ५.५ असल्याचे नमूद केले आहे. या भूकंपाचे केंद्र हुआंकायो प्रांतातील सिकाया शहराजवळ होते आणि त्याची खोली सुमारे १० किलोमीटर होती.
पेरूच्या राष्ट्रीय नागरी संरक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक घरे कोसळली किंवा गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली आहेत. स्थानिक चर्च आणि कॉन्व्हेंटलाही फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, ४८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून १८ घरांचे नुकसान झाले आहे. सुमारे ३०० नागरिक प्रभावित झाले असून त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये तंबू उपलब्ध करून दिले जात आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचाव पथके, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा सातत्याने मदतकार्य करत आहेत.स्थानिक नागरी संरक्षण प्रमुख लुईस वास्केझ यांनी सांगितले की, या डोंगराळ भागातील बहुतांश घरे माती आणि कच्च्या विटांपासून (अडोबी) बांधलेली आहेत. त्यामुळे भूकंपाचा फटका अधिक गंभीर स्वरूपाचा ठरला.
सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक असलेल्या चोंगो बाजो येथे अनेक नागरिकांना उद्ध्वस्त झालेल्या घरांबाहेर चादरी आणि ब्लँकेटमध्ये रात्र काढावी लागली. अनेक पाळीव प्राणीही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.
पेरू हा देश प्रशांत महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ या भूकंपप्रवण पट्ट्यात स्थित आहे. जगातील सर्वाधिक भूकंपग्रस्त प्रदेशांपैकी हा एक मानला जातो. जगातील सुमारे ८५ टक्के भूकंपीय हालचाली याच क्षेत्रात घडतात. यापूर्वी २००७ मध्ये, पेरूमधील पिस्को भागात ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला होता. त्या दुर्घटनेत सुमारे ६०० जणांचा मृत्यू झाला होता.
-----------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode