
नांदेड, 21 जुलै (हिं.स.)।
मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची सुवर्णसंधी
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर ‘मधकेंद्र’ (मधमाशी पालन) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मधमाशी पालनासाठी आवश्यक प्रशिक्षण तसेच अनुदानाच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याने इच्छुक लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
मधमाशी पालनामुळे मध आणि मेणाच्या विक्रीतून उत्पन्न मिळण्याबरोबरच पिकांच्या परागीकरणामुळे उत्पादनात सुमारे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होते. कमी जागा आणि तुलनेने कमी भांडवलात सुरू करता येणारा हा फायदेशीर व्यवसाय असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
योजनेअंतर्गत मधपालन साहित्य खरेदीसाठी 50 टक्के अनुदान तर उर्वरित 50 टक्के लाभार्थी हिस्सा राहणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना स्थानिक स्तरावर 10 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रगतशील मधपालक, केंद्रचालक किंवा संस्थांसाठी महाबळेश्वर येथील मधसंचालनालयात 20 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी मधपालन युनिटसाठी 18 वर्षांवरील साक्षर असावा. प्रगतशील मधपालन युनिटसाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असणे तसेच एक एकर शेती असणे आवश्यक आहे. अर्जासोबत ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, शिवाजी नगर, नांदेड येथे संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या दूरध्वनी तसेच dvionanded@rediffmail.com ई-मेलद्वारे किंवा मध निरीक्षक ज्ञानेश्वर राऊतराव यांच्याशी 9689200239 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis