
पुणे, 21 जुलै (हिं.स.)भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात येणार असून, त्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, संघटना तसेच संबंधित घटकांकडून ऑनलाइन अर्ज व नामांकन मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरू झाली असून, विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या अर्ज व नामांकनांचा विचार करून वर्ष २०२६ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, प्रत्यक्ष अथवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्जदारांनी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यानुसार सर्व माहिती अचूकपणे भरावी. तसेच, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्याचा वर्णनात्मक तपशील नमूद करून त्यासंबंधीची आवश्यक सहाय्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन आणि श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणींमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत. श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका या उप-श्रेणीसाठी अर्ज करताना यूडीआयडी कार्ड अथवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठीची पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती https://depwd.gov.in आणि https://awards.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असून, इच्छुकांनी त्याचा संदर्भ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असेही डॉ. देवढे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु