
तेहरान, 21 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने इराणमधील विविध ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणने कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला असून, राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी तेहरानची अमेरिकेविरुद्धची लढाई सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
इराणी सैन्याने मंगळवारी पहाटे कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळाला क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील संघर्ष आता पूर्ण स्वरूपाच्या युद्धात बदलला आहे.राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी म्हटले, “आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण पूर्ण स्वरूपाच्या युद्धात सहभागी झाले आहे. आपल्याला ही वास्तवता स्वीकारावी लागेल आणि या प्रतिकाराच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल.”
सरकारी वृत्तसंस्थाच्या लष्कराच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या भूदलाने कुवेतमधील आरिफजान तळावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या एचआयएमएआरएस क्षेपणास्त्र प्रणालींना भूपृष्ठावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले.अहवालानुसार, एचआयएमएआरएस ही अत्यंत गतिमान क्षेपणास्त्र प्रणाली असून ती वेगाने हालचाल करून जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यास सक्षम आहे. या हल्ल्यात शत्रूच्या क्षेपणास्त्र क्षमतेला मोठा फटका बसल्याचा दावा इराणने केला आहे.कुवेत सिटीच्या दक्षिणेला असलेले कॅम्प आरिफजान हे अमेरिकन हवाई दल, नौदल, मरीन कॉर्प्स आणि तटरक्षक दलासाठी महत्त्वाचे लष्करी केंद्र मानले जाते. इराणी हल्ल्यानंतर कुवेतमध्ये हवाई सतर्कता वाढविण्यात आली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडच्या काळात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचे मानले जात आहे. इराणने ही कारवाई प्रत्युत्तरात्मक असल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेने या हल्ल्याला प्रादेशिक स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. कुवेतनेही या हल्ल्यांचा निषेध केला असून आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क आणि सक्रिय ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode