पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; 12 जणांचा मृत्यू, 18 जखमी
इस्लामाबाद , 21 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मुसळधार पाऊस आणि पूरामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विविध दुर्घटनांमध्ये 18 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसा
पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; 12 जणांचा मृत्यू, 18 जखमी


इस्लामाबाद , 21 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मुसळधार पाऊस आणि पूरामुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विविध दुर्घटनांमध्ये 18 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.याशिवाय, विविध भागांतील घटनांमुळे 14 घरे नुकसानग्रस्त झाली आहेत.

अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमेकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली. या नैसर्गिक आपत्तीत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे.

प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (पीडीएमए) अहवालानुसार, घरांच्या छतां व भिंती कोसळणे तसेच अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाणे ही मृत्यूंची प्रमुख कारणे होती. मृतांमध्ये 6 पुरुष, 5 मुले आणि 1 महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये 8 पुरुष, 2 महिला आणि 8 मुलांचा समावेश आहे. ही प्रकरणे पेशावर, खैबर, मरदान, बुनेर, बाजौर, लोअर चित्राल, अॅबटाबाद, मानसेहरा, तोरघर आणि कुर्रम या जिल्ह्यांतून समोर आली आहेत. पीडीएमए च्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे एकूण 14 घरे नुकसानग्रस्त झाली. त्यापैकी एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून उर्वरित घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

पीडीएमए, रेस्क्यू 1122, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित विभागांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले आहे. पीडीएमएचे महासंचालक यांनी जिल्हा प्रशासनाला प्रभावित कुटुंबांना त्वरित मदत साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.अहवालानुसार, प्रांतातील प्रमुख नद्या, ओढे आणि जलमार्गांमधील पाण्याची पातळी व प्रवाह सध्या सामान्य मर्यादेत आहेत. मात्र, पाकिस्तान हवामान विभागाने 25 जुलैपर्यंत संपूर्ण प्रांतात अधूनमधून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पीडीएमए ने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, धोकादायक पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचे तसेच नद्या, ओढे आणि पूरग्रस्त मार्गांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत इशाऱ्यांचे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. प्राधिकरणाने स्पष्ट केले की, सर्व जिल्हा प्रशासनांना आधीपासूनच ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande