
जेरुसलेम , 21 जुलै (हिं.स.)।इस्रायलने पुन्हा एकदा दावा केला आहे की इराण पडद्यामागे आपला अणुकार्यक्रम (न्यूक्लिअर प्रोग्राम) सुरू ठेवण्याची तयारी करत असू शकतो. इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या मते, इराणने गेल्या वर्षी युरेनियम संवर्धनासाठी (एनरिचमेंट) वापरल्या जाणाऱ्या सेंट्रिफ्यूज यंत्रणा ‘पिकअॅक्स माउंटन’ नावाच्या अतिसुरक्षित भूमिगत संकुलात हलवल्या होत्या. मोसादचा दावा आहे की भविष्यात इराण याच ठिकाणाहून आपला अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतो.
हा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कायम असून अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिका दीर्घकाळापासून असा आरोप करत आहेत की इराणचा अणुकार्यक्रम केवळ ऊर्जा निर्मितीपुरता मर्यादित नाही. मात्र, इराणने सातत्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेतील एका अहवालानुसार, इस्रायली आणि अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या 12 दिवसांच्या इस्रायल-इराण संघर्षानंतर तेहरानने युरेनियम संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या सेंट्रिफ्यूज यंत्रणा पिकअॅक्स माउंटनखालील खोल बोगद्यांमध्ये हलवल्या. अहवालानुसार, इस्रायलने ही माहिती अमेरिकेसोबतही शेअर केली आहे.
पिकअॅक्स माउंटन, ज्याला ‘माउंट कोलांग’ असेही म्हटले जाते, हे इराणमधील अत्यंत सुरक्षित भूमिगत संकुल आहे. ते नतांज येथील युरेनियम संवर्धन केंद्राजवळ स्थित आहे. या केंद्रावर यापूर्वीही अनेकदा हल्ले झाले आहेत.या परिसरात खोल भूमिगत बोगद्यांचे विस्तृत जाळे आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, हे बोगदे इतक्या खोलीवर आहेत की अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली ‘बंकर-बस्टर’ बॉम्बसुद्धा त्यांना पूर्णपणे नष्ट करू शकणार नाहीत. 2020 मध्ये झालेल्या स्फोटात नष्ट झालेल्या भूमिगत सेंट्रिफ्यूज असेंब्ली केंद्राच्या पर्याय म्हणून इराणने या ठिकाणाचा विकास केला होता.
इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीच्या अहवालानुसार, पिकअॅक्स माउंटन परिसरात अलीकडच्या काही महिन्यांत ट्रकची वाढती ये-जा आणि बांधकामविषयक हालचाली आढळून आल्या आहेत. अहवालात म्हटले आहे की बोगदे अधिक मजबूत केले जात असून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. तज्ज्ञ आणि इस्रायली अधिकाऱ्यांना अशी भीती आहे की इराण या बोगद्यांचा वापर अणुसंबंधित यंत्रसामग्री सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा युरेनियम संवर्धनासाठी लहान पण प्रभावी सुविधा उभारण्यासाठी करू शकतो. त्यामुळेच इस्रायल या ठिकाणाबाबत विशेष चिंता व्यक्त करत आहे.
सेंट्रिफ्यूज ही अशी यंत्रे आहेत, ज्यांच्या मदतीने युरेनियम वायू वेगाने फिरवून त्यातील विविध समस्थानिक (आइसोटोप्स) वेगळे केले जातात आणि त्याचे संवर्धन केले जाते.संवर्धित युरेनियमचा वापर अणुऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. मात्र, अत्यंत उच्च पातळीपर्यंत संवर्धन झाल्यास त्याचा वापर अण्वस्त्रे तयार करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळेच या यंत्रणांवरील हालचालींवर जगातील प्रमुख शक्तींचे बारकाईने लक्ष असते.
इस्रायल आणि अमेरिकेच्या आरोपांच्या विरोधात इराण सातत्याने सांगत आला आहे की त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण उद्देशांसाठी आहे. इराणचा दावा आहे की हा कार्यक्रम अणुऊर्जा निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनासाठी चालवला जात असून अण्वस्त्रे विकसित करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.
आंतरराष्ट्रीय मंचांवरही इराणने अनेकदा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की त्याचा अणुकार्यक्रम लष्करी उद्देशांसाठी नाही. तरीही इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या शंका कायम आहेत. त्यामुळे हा मुद्दा मध्यपूर्वेतील राजकारण आणि जागतिक सुरक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा विषय बनला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode