
जालना, 21 जुलै (हिं.स.)। जालना शहरातील कन्हैयानगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर (UHWC) येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, जिल्हा क्षयरोग केंद्र, जालना तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अशा आरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना वेळेवर तपासणी, उपचार आणि विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळतो. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
यापुढे बोलताना त्यांनी जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून बौद्ध विपश्यना केंद्र भव्य सभागृह उभारणीसाठी सुमारे १३० कोटी रुपयांच्या मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ही कामे जालना शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रगतीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रभाग क्रमांक ०२ चे नगरसेवक दीपक राठोड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर हे सातत्याने नागरिकांच्या आरोग्य, विकास आणि जनकल्याणासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे जालना शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना गती मिळाली असून शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाग क्रमांक २ च्या वतीने शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष ए. जे. बोराडे, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक दुर्गेश कठोडीवाले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis