
वॉशिंग्टन , 21 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आता वाढला असून अमेरिका आणि इराण एकमेकांच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहेत. दरम्यान, अमेरिकन सैन्याने सोमवारी उशिरा रात्री इराणवर नव्या हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या प्रयत्नांतर्गत इराणी लष्करी तळांवर अमेरिका सलग दहाव्या रात्री हल्ले करत आहे.
यूएस सेंट्रल कमांडने एक्सवर माहिती देताना सांगितले की, सरसेनापतींच्या आदेशानुसार सायंकाळी ४ वाजता (ईस्टर्न टाइम) इराणविरोधातील नव्या हल्ल्यांना सुरुवात करण्यात आली. या हल्ल्यांचा उद्देश इराणच्या त्या लष्करी क्षमतांना आणखी कमकुवत करणे हा आहे, ज्यांचा वापर होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांसाठी केला जात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे.
एका अमेरिकन सैनिकाच्या मृत्यूनंतर तसेच इराणने अमेरिकेचे सहयोगी देश असलेल्या कुवेत, जॉर्डन आणि बहरीन (जिथे अमेरिकन नौदलाचा पाचवा ताफा तैनात आहे) यांच्यावर हल्ले केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली असून दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, इराणच्या सागरी हालचालींना आळा घालण्यासाठी आणि प्रादेशिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे.
संकट अधिक गडद होत असताना कच्च्या तेलाच्या किंमतीतही सुमारे ३ टक्क्यांनी वाढ झाली असून अमेरिकेतही इंधनाचे दर वाढले आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे. वृत्तानुसार, दोन्ही बाजूंनी सोमवारी पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अधिक तपशील न देता एवढेच सांगितले की, तणाव कमी करण्यासाठी इराणला काही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे, ट्रम्प प्रशासनानेही नव्या चर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “जर चर्चेचे दरवाजे खुले झाले, तर आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, चांगले परिणाम पाहायचे असतील तर दुसऱ्या बाजूनेही सकारात्मक वर्तन अपेक्षित आहे.”
तथापि, दोन्ही पक्ष इतक्या लवकर कोणत्याही करारावर पोहोचतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण अमेरिकन अधिकाऱ्यांनी पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमाने पाठवली जात असल्याची माहिती दिली आहे. यावरून ट्रम्प प्रशासन हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना पश्चिम आशियातून सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode