लोहारा पोड जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) । शहरालगतच्या लोहारा कोलाम पोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेच्या जुन्या जीर्ण इमारतीची भिंत सोमवारी सकाळी सुमारे सात वाजता कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,
लोहारा पोड जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात;


यवतमाळ, 21 जुलै (हिं.स.) । शहरालगतच्या लोहारा कोलाम पोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेच्या जुन्या जीर्ण इमारतीची भिंत सोमवारी सकाळी सुमारे सात वाजता कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोहारा कोलाम पोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून येथे एकूण ८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या जुन्या इमारतीचे बांधकाम जुन्या पद्धतीचे असून २०१२ मध्ये करण्यात आलेल्या वर्गखोलीच्या बांधकामावरही ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचा आरोप केला आहे.

दरम्यान, २०२५ मध्ये दुसऱ्या जागेवर शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, जुन्या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाल्याने ती निर्लेखन करण्याचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळून बराच कालावधी लोटला असतानाही अद्याप इमारत निर्लेखनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

आता जुन्या इमारतीच्या भिंतींसह स्लॅबचा मलबाही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी शाळेच्या एका बाजूच्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तातडीने इमारत निर्लेखनाची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

नवीन इमारतीलाही गळतीची समस्या

जुन्या इमारतीनंतर २०१५ मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत सध्या वर्ग भरविले जात आहेत. मात्र, पावसाळ्यात या इमारतीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे अनेकदा वर्ग बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते.

शाळेच्या नवीन इमारतीतील गळती आणि जुन्या इमारतीच्या धोकादायक स्थितीकडे पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande