सोलापूर : आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी कुस्तीचा थरार; वाखरीत महावीर स्पर्धेचे आयोजन
सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)।आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी एक अभिनव उपक्रम म्हणून ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळाशेजारी असलेल्या विश्वशांती गुरुकुल परिसरात आयोजित करण
सोलापूर : आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी कुस्तीचा थरार; वाखरीत महावीर स्पर्धेचे आयोजन


सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)।आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी एक अभिनव उपक्रम म्हणून ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळाशेजारी असलेल्या विश्वशांती गुरुकुल परिसरात आयोजित करण्यात आली आहे. विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दुपारी १.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे यांनी वारकरी मल्लांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, हिंद केसरी दिनानाथ सिंग आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार समाधान आवताडे, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम आणि महाराष्ट्र केसरी पै. विष्णूतात्या जोशीलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वारकरी मल्लांनी २३ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता विश्वशांती गुरुकुलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. विलास कथुरे (मो. ९८५०२११४०४) किंवा पै. राहुल बिराजदार (मो. ८००७५९३४३४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande