रायगडमधील 315 शाळा नादुरुस्त; निवडक शाळांवरच निधीचा वर्षाव?
रायगड, 23 जुलै (हिं.स.)। आरटीआयतील माहितीवरून निधी वाटपावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी जिल्ह्यातील तब्बल 315 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतानाही काही निवडक शाळांवर वारंवार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा
रायगडमधील 315 शाळा नादुरुस्त; निवडक शाळांवरच निधीचा वर्षाव?


रायगड, 23 जुलै (हिं.स.)।

आरटीआयतील माहितीवरून निधी वाटपावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

जिल्ह्यातील तब्बल 315 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतानाही काही निवडक शाळांवर वारंवार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या 246 पानांच्या माहितीनुसार, जून 2026 अखेर जिल्ह्यातील 315 शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 25.83 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून 29 शाळा बंद आहेत, तर 971 शिक्षकांची पदे रिक्त असल्याचेही या माहितीत नमूद आहे.

आरटीआयतील नोंदीनुसार सहाण, कुसुंबळे, सारळ, कुर्डुस, धाकट शहापूर, चौल, वाडगाव आणि पेझारी येथील शाळांना 2023 ते 2026 या कालावधीत नवीन इमारत, दुरुस्ती, अतिरिक्त वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांसाठी एकापेक्षा अधिक वेळा निधी मंजूर करण्यात आला. वाडगाव शाळेला नवीन इमारतीसाठी 50 लाख आणि दुरुस्तीसाठी 10 लाख, तर सहाण शाळेला नवीन इमारतीसाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दस्तऐवजांत असल्याचा दावा सावंत यांनी केला.

निधी वाटपाचे निकष, समान वितरण आणि मंजूर कामांचा दर्जा याबाबत संशय निर्माण होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी संजय सावंत यांनी केली आहे. या आरोपांमुळे जिल्हा नियोजन विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande