प्रतिपंढरपूरात आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान, तीर्थक्षेत्र ''ब'' दर्जा प्राप्त, ता. उदगीर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिर परिस
आषाढी एकादशी


लातूर, 25 जुलै (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान, तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा प्राप्त, ता. उदगीर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिर परिसर व परिसरातील सर्व मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. विशेष म्हणजे सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा कायम होत्या, त्यामुळे दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

पहाटे ५:३० वाजता उदगीरचे उपजिल्हाधिकारी डॉ. सुशांत शिंदे यांच्या शुभहस्ते श्री समर्थ धोंडुतात्या महाराजांची शासकीय महापूजा व महाआरती अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. महापूजेनंतर श्री समर्थ धोंडुतात्या महाराज मंदिर संस्थानच्या वतीने उपजिल्हाधिकारी डॉ. सुशांत शिंदे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

दुपारनंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद सदस्या सौ. उषाताई यमुनाजी भुजबळे, पंचायत समिती सभापती वनमाला मरलापल्ले, माजी उपसभापती रामप्रसाद बेंबडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मंदिरात उपस्थित राहून श्री समर्थ धोंडुतात्या महाराजांचे दर्शन घेतले.

आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविकांनी पायी दिंड्यांमधून मुखी हरिनामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि नागमोडी वळणाच्या मार्गाने मंदिराकडे प्रस्थान केले. विठ्ठल नामाच्या गजरात भक्त आनंदाने पावले टाकत पुढे सरकत होते. हे भक्तिमय आणि मनोहारी दृश्य उपस्थितांच्या मनात कायमची आठवण बनून राहिले.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सामाजिक संस्था, सेवाभावी मंडळे आणि ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी चहा, फराळ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवेमुळे भाविकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाढवणा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अहमदपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) यांनी मंदिर परिसराला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उदगीर आगाराच्या वतीने तब्बल ११० अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या बसफेऱ्यांमुळे हजारो भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली. उदगीर आगाराचे वाहतूक नियंत्रक सचिव पटवारी यांनी दिवसभर स्वतः उपस्थित राहून बससेवेचे नियोजन, वाहतूक नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री समर्थ धोंडुतात्या महाराज मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रशासन, पोलीस विभाग, एसटी महामंडळ, मंदिर संस्थान, सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत दर्शन रांग सुरू असल्याने भाविकांचा उत्साह आणि श्री समर्थ धोंडुतात्या महाराजांवरील अखंड श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande