
अमरावती, २३ जुलै (हिं.स.) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्राध्यापकांची आवश्यक पदभरती न करणाऱ्या २९ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या निर्णयाला मंजुरी दिली असून ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात संबंधित महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे.
संबंधित महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही प्रवेशबंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पदभरती पूर्ण करण्याबाबत महाविद्यालयांनी विद्यापीठाला कायदेशीर प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, त्यानंतरही आवश्यक शिक्षक भरती न झाल्याने आणि नियमांचे उल्लंघन झाल्याने विद्यापीठाने यंदाही प्रवेशबंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.
दरम्यान, प्रवेशबंदीच्या यादीतील काही महाविद्यालयांना विशिष्ट अटींवर तात्पुरती शिथिलता देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘परिशिष्ट-अ’ मध्ये समाविष्ट असलेल्या महाविद्यालयांना नामांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, निर्धारित कालावधीत पदभरती पूर्ण करण्याच्या अटीवर तात्पुरती प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची स्थिती आणि पात्रता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासूनच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि भविष्यातील अडचणी टाळता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवेशबंदी घालण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र कला महाविद्यालय (शिराळा), स्व. पंचफुलाबाई भारसाकळे महाविद्यालय (सातेगाव), श्रीराम महाविद्यालय (मोर्शी), मधुबन महाविद्यालय (धारणी) आणि डॉ. एस. एस. गोरडे विज्ञान महाविद्यालय (अचलपूर) यांचा समावेश आहे. तसेच अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचाही प्रवेशबंदीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी