
अमरावती, 23 जुलै (हिं.स.)“धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या”, अशा घोषणांनी आज अमरावती शहरातील जयस्तंभ चौक व संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला. काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या कथित विद्यार्थीविरोधी भूमिकेच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पुतळा, जयस्तंभ चौक येथे ‘धिक्कार आंदोलना’चे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनावरून पुकारण्यात आलेल्या बंदला मात्र संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बाजारपेठ काही वेळासाठी बंद करण्यात आली होती.
आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर शांततापूर्ण आंदोलन केले असता त्यांच्यासह प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आल्याचा उल्लेख करत, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर झालेली ही कारवाई लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. यानंतर जयस्तंभ चौक ते संपूर्ण मार्केट परिसरात पायदळ मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला.
वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत बंदचे आवाहन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा अडवण्यात आला. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाही आणि संविधानिक अधिकारांवरचा हल्ला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, संजय चौरपगार, सुरेश तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव नयन मोंढे यावेळी उपस्थित होते. मोर्चात राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस, सेवादल, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक विभाग, तसेच विविध सेल व विभागांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध देशभरातून होत आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी