यवतमाळमध्ये ५३७ पोलीस अंमलदारांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ
यवतमाळ , 23 जुलै (हिं.स.) जिल्हा पोलीस दलाने पोलीस अंमलदारांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत तब्बल ५३७ पात्र पोलीस अंमलदारांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ म
तब्बल ५३७ पोलीस अंमलदारांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ


यवतमाळ , 23 जुलै (हिं.स.)

जिल्हा पोलीस दलाने पोलीस अंमलदारांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत तब्बल ५३७ पात्र पोलीस अंमलदारांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवेला न्याय मिळणार असून त्यांच्या वेतन व सेवाविषयक लाभांमध्ये वाढ होणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांच्या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा विशेष आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रकरणाची नियमानुसार सखोल छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि अत्यंत अल्पावधीत प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून या लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र पोलीस अंमलदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आश्वासित प्रगती योजना ही पदोन्नतीची संधी न मिळालेल्या पात्र पोलीस अंमलदारांना त्यांच्या सेवेची दखल घेऊन आर्थिक व सेवाविषयक लाभ देण्यासाठी शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे संबंधित पोलीस अंमलदारांचे मनोबल उंचावले आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दल कर्मचारी कल्याण, सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना सातत्याने प्राधान्य देत आहे. अधिकारी व अंमलदार यांचे हित जपणे ही देखील पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याची भूमिका जिल्ही पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अधोरेखित केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande