
सोलापूर, 23 जुलै (हिं.स.)। शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या भैय्या चौकातील नव्या पुलाच्या बांधकामाला वेग आला असून मुख्य आरसीसी पिलरचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जुन्या ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या गोलाकार पिलरचे आरसीसी खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुलासाठी आवश्यक असलेल्या १६ मुख्य पिलरपैकी दोन्ही बाजूंचे आठ-आठ अशा सर्व मुख्य पिलरचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामही गतीने सुरू आहे. मुख्य पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलावर गर्डर बसविण्याच्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार आहे.
संबंधित ठेकेदाराला हा प्रकल्प येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुलासह आजूबाजूचा परिसर समतल करण्याचे कामही एकाचवेळी सुरू असून संपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे.
भैय्या चौक ते मरिआई चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज हजारो नागरिक आणि वाहनांची या मार्गावरून ये-जा असते. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने नव्या पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड