
पुणे, 23 जुलै (हिं.स.)। पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘भारत नव-निर्माण चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला. निकमार युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने, एआयसीटीइ आणि अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) यांच्या सहभागातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत पीसीसीओई च्या विद्यार्थ्यांनी एआय स्मार्ट सेफ्टी हेल्मेट हा प्रकल्प सादर केला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून एकूण ४५५ पेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता. पीसीसीओई च्या विजेत्या संघात आदित्य आघाव, सिद्धेश देसाई आणि अर्शिया इनामदार यांचा समावेश होता. त्यांना डॉ. धीरजकुमार लाल, डॉ. विनय रंगारी, डॉ. मनीष नारखेडे आणि डॉ. राजेश फुरसुलेयांनी मार्गदर्शन केले. दिल्ली येथे झालेल्या बक्षीस वितरण समारंभात त्यांचा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी एचसीसी, लार्सन अँड टुब्रो, टाटा प्रोजेक्ट्स, गॅमन इंडिया यांसह देशातील आघाडीच्या बांधकाम कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु